नंदुरबार व धडगाव निरंक
सहा कृऊबा समितींसाठी ५९३ अर्जाची विक्री
नंदुरबार : जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. २७ मार्च पासून नामांकन अर्ज विक्री व दाखल करण्यात येणार आहेत.
दरम्यान, आज नामांकन दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सहा कृऊबा समितींसाठी तब्बल ५९३ अर्जाची विक्री झाली आहे.
तर नंदुरबार व धडगाव वगळता चार तालुक्यात आजअखेर ७७ जणांनी आपले नांमाकन दाखल केले आहेत.
नंदुरबार व धडगाव येथे शेवटच्या दिवशी नामांकन दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव व नवापूर या सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे प्रक्रिया सुरू झाली आहे.
२७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान नामांकन अर्ज विक्री व दाखल करता येणार आहे. दाखल अर्जाची ५ एप्रिल रोजी छाननी होणार आहे. ६ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत माघारीची मुदत आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना २१ एप्रिल रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. २८ एप्रिल रोजी आवश्यक असल्यास निवडणूक घेण्यात येणार असून मतदाना नंतरच्या तीन दिवसांच्या आत मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम काम पाहत आहेत.
दरम्यान, अर्ज दाखलच्या आज तिसऱ्या दिवशी ७७ जणांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
यात शहादा ४१, नवापूर ०३, तळोदा १४ व अक्कलकुवा येथे १९ अर्ज दाखल झाले आहेत. नंदुरबार व धडगाव येथे अद्याप एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही.
दुहेरी लढत होण्याची शक्यता
जिल्ह्यातील कृऊबा समितींसाठी अर्जविक्री व दाखल करण्यासाठी भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक दुहेरी होईल, असा अंदाज राजकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. माघारी नंतर याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.
तळोदा कृऊबाकडे लक्ष
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत यापूर्वी निवडणूक बिनविरोध झाली आहे. याठिकाणीची बिनविरोधची परंपरा कायम राहते का निवडणूक लागते याकडे तळोदेकरांसह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
मेळाव्यावर भर
सध्या निवडणूक प्रक्रिया पहिल्या टप्प्यात असली तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. या निवडणुकीची शहरासह ग्रामीण भागात चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला नसला तरी नेते मेळावे, बैठका घेऊन निवडणूकीवर लक्ष ठेऊन आहेत.त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
जीवन पाटील, कार्यकारी संपादक एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार