नाशिक जिल्ह्यात चौदा बाजार समित्यांसाठी आज मतदान: शंभरावर मतदान केंद्रांची व्यवस्था

0
118

नाशिक -२८/४/२०२३

Nashik Market Committee Election : जिल्ह्यातील नाशिक आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील लढती यंदा चर्चेत आहेत. येवला, सिन्नर आणि मालेगावसारख्या तालुक्यांमध्येही दिग्गजांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील चौदा बाजार समित्यांसाठी आज, शुक्रवारी (दि. २८) मतदान होत आहे. राज्यातील सातत्याने बदलणाऱ्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर यंदा बाजार समितीच्या निवडणूक आखाड्यात विधानसभेची रंगीत तालीम रंगल्याचाच प्रत्यय येत आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये यंदा महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना (शिंदे गट)-भाजप असा प्रमुख सामना रंगत आहे.

काही ठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी होऊन काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात शिवसेना (ठाकरे गट) अशाही लढती दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारातील इतर निवडणुका यंदा लांबणीवर पडल्या आहेत.

त्यामुळे बाजार समितीच्या आखाड्यातच विधानसभेची पायाभरणी करण्याचे औचित्य सर्वच पक्षांकडून साधले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज, शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत नाशिकसह जिल्ह्यातील सुमारे शंभर केंद्रांवर मतदान होणार आहे.

जिल्हा बँकेसह अन्य निवडणुका लांबल्याने वजनदार नेत्यांनी आपला मोर्चा बाजार समितीकडे वळविल्याने यंदा प्रत्येक समितीत इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र आहे.

परिणामी, अनेक नवोदितांसह पक्षातील नाराजांनी अखेरपर्यंत अर्ज मागे न घेतल्याने पॅनलनिर्मितीसाठीही सर्वच तालुक्यांमध्ये तडजोडी कराव्या लागल्या. प्रत्येक तालुक्यातील आजी-माजी आमदारांभोवती या समितीचे राजकारण फिरत असल्याने त्या-त्या तालुक्यातील दिग्गजही सक्रिय झाले आहेत.

गुरुवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतरही मतदारांशी विविध मध्यस्थांद्वारे अप्रत्यक्ष संपर्क साधण्याचे प्रकारदेखील जिल्हाभरात घडले.

या प्रकारांसह लक्ष्मीदर्शनाच्या खुमासदार चर्चांना जिल्हाभरात उधाण आले आहे.

नाशिक, पिंपळगावमध्ये सरळ लढत-

नाशिक बाजार समितीत माजी खासदार देवीदास पिंगळे आणि माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे.

दोन्ही मातब्बरांनी नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुके पिंजून काढले आहेत. चुंभळे यांनी पिंगळेंना धोबीपछाड देण्यासाठी सहकार, न्यायालय आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अपिल करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पिंगळेंनी कायदेशीर मार्गाने ही आव्हाने परतवून लावीत आपले आव्हान कायम ठेवत व्यापरी अन् हमाल-मापारी गटातून तीन सदस्य बिनविरोध करीत टक्कर दिली आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत यंदा आमदार दिलीप बनकर विरुद्ध माजी आमदार अनिल कदम यांच्या पॅनलमध्ये सरळ होणारी लढत रंगतदार बनली आहे.

आरोप-प्रत्यारोपांनी आतापर्यंतचा माहोल चांगलाच तापला असल्याने या निवडणुकीच्या प्रचारास विधानसभेचे स्वरूप आल्याचे दिसले.

येवला, लासलगाव, मनमाड, नांदगावमध्ये चुरस

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी विकास पॅनल आणि जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, कुणाल दराडे व भाजपचे बाबा डमाळे यांच्या नेतृत्त्वाखालील शेतकरी समर्थक अशा दोन पॅनलमध्ये थेट लढत होत आहे.

भुजबळांनी आमदार दराडे बंधूंनाच थेट आव्हान दिले आहे.

लासलगावमध्ये जयदत्त होळकरांच्या पॅनलविरोधात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे या माध्यमातून भुजबळ विरुद्ध थोरे असे चित्र आहे.

नांदगाव आणि मनमाड समित्यांमध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी ‘मविआ’समोर आव्हान उभे केले आहे.

माजी खासदार समीर भुजबळ आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनीही क्षमता पणाला लावली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

मालेगाव या पालकमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यात त्यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनलला शिवसेना ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांनी आव्हान देऊन निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. दोन्हीही नेते मातब्बर असल्याने ही निवडणूकही लक्षवेधी बनली आहे.

सिन्नरमध्ये आमदार माणिकराव कोकाटे विरुद्ध माजी आमदार राजभाऊ वाजे-उदय सांगळे अशी लढत रंगत आहे.

कळवणमध्ये आमदार नितीन पवार विरुद्ध माजी आमदार जे. पी. गावित, तर चांदवडमध्ये माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल विरुद्ध भाजपचे नेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्यात लढत होत आहे. दिंडोरी व देवळा बाजार समितीच्या निवडणुकीकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी , एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here