सभागृहात प्रशासकीय व विनंती बदलीसाठी स्क्रीन लावण्यात येऊन राबविण्यात आली पारदर्शक प्रक्रिया
नंदुरबार : – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत कार्यरत अनेक शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांच्या बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख उपस्थित ३ शिक्षण विस्तार अधिकारी यांची प्रशासकीय तर केंद्रप्रमुख यांची प्रत्येकी ५ प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
याबाबत दोन दिवसांपूर्वी एम.डी.टी.व्ही.ने ” शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या बडल्याना ब्रेक का ? ” या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख हे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली होणे आवश्यक व तसा नियम आहे. मात्र आपली बदली होऊ नये यासाठी मागीलवर्षी व आताही आर्थिक व्यवहार होत असल्याची जिल्हा परिषद वर्तुळातून चर्चा करण्यात येत होती.
गेल्या अनेक वर्षांपासून सपाटीवर कार्यरत असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी यांना दुर्गम भागात शिक्षणाची गंगोत्री पोहचविण्यासाठी बदली करावी. तसेच अगदी नर्मदेकाठी सेवा देणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकारी यांना सपाटीवर आणावे, अशी मागणी होत होती. याबाबत एम.डी.टी.व्ही.ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांच्या बदलीसाठी आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिबीर झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, शिक्षण सभापती गणेश पराडके, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीष चौधरी आदी उपस्थित होते.
सभागृहात प्रशासकीय व विनंती बदलीसाठी स्क्रीन लावण्यात येऊन पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी शिक्षण विस्तार संवर्गातून ३ विनंती व ३ प्रशासकीय बदली प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र यात ३ प्रशासकीय बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विनंती बदली प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. तर केंद्रप्रमुख प्रत्येकी ५ विनंती व प्रशासकीय बदली प्रक्रिया राबविण्यात आली. केंद्रप्रमुख बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार