दीड हजार हेक्टरवरील अतिक्रमण हटविले ; वन विभागाची कारवाई
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीतील सोनपाडा, भांगडा वनक्षेत्रात परप्रांतीय ( गुजरात ) येथील काही नागरिकांनी वन जमिनीवर अतिक्रमण करुन पीक पेरा केल्याचे दिसून आले आहे. सदरचे अतिक्रमण काढून घेण्यासाठी वन विभागातर्फे मोहीम हाती घेण्यात आली. सुमारे दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल दीड हजार हेक्टरवरील अतिक्रमण नष्ट करुन यंत्राच्या सहाय्याने खोल, सलग, समतल चर खोदकाम करुन वनजमीन ताब्यात घेण्यात आली आहे.
नंदुरबार वन क्षेत्र (रोहयो) मधील नियतक्षेत्र सोनपाडा, भांगडा यातील कक्ष क्रमांक २७, २८, २९, ३०, ३१, ३२ यातील राखीव वनातील अवैधरित्या परराज्यातील (गुजरात राज्य) व स्थानिकांनी सुमारे १६०० हेक्टर वन जमिनीवर पीक पेरा केल्याचे दिसून आले. यामुळे राखीव वनांसंबंधी अतिक्रमण हटविण्याचे वन अधिकारी यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन सदर ठिकाणावरील अतिक्रमण निष्काषण मोहीम दि.३ मार्चपासून सुरु करण्यात आली होती.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या मोहिमेदरम्यान कक्ष क्र. २७ ते ३२ दरम्यानचे सुमारे १ हजार ५२५ हेक्टर वन क्षेत्रावरील अतिक्रमण नष्ट करुन यंत्राच्या सहाय्याने खोल सलग समतल चर खोदकाम करुन वन जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. सदर कार्यवाही नंदुरबार वन विभागाचे उपवनसंरक्षक कृष्णा भंवर, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वन परिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, वनपाल प्रियंका निकुंभे, वनरक्षक अरविंद निकम, किसन वसावे, नयना हडस, वाहन चालक दिपक विभांडीक, रवि गिरासे, दिनेश वळवी, रुपेश वसावे तसेच नंदुरबार व नवापूर वनक्षेत्र व चिंचपाडा वन क्षेत्राच्या सहकार्याने करण्यात आली.
वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण अवैध वृक्षतोड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास वन विभागाशी संपर्क साधावा. जमीन वाचली तर जंगल वाचेल तर पर्यावरण वाचेल याप्रमाणे प्रत्येकाने जल, जंगल जमिन वाचविण्यासाठी सहाकार्य करावे,असे आवाहन नंदुरबार वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांनी केले आहे.
या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी मनिषा खत्री, पोलिस अधिकारी पी.आर.पाटील, उपविभागीय महसूल अधिकरी मिनल करनवाल, आदिवासी उपविभागीय अधिकारी मंदार पत्की, नवापूर तहसीलदार डॉ.मिलींद कुळकर्णी, स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनाने सहकार्य केले.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.