सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये “मिशन थायरॉईड अभियान” राबविण्यात येणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

0
138

girish mahajan

मुंबई, दि. 29 : ​वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियान सुरु केले आहेत.राज्यात 30 मार्च 2023 पासून “मिशन थायरॉईड अभियान” राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

साधारणपणे प्रत्येकी 1 लाख महिलांमागे अंदाजे 2,000 महिलांना दृश्य स्वरुपात थायरॉईडची गाठ मानेवर दिसून येते. त्याचप्रमाणे अनेक महिलांना थायरॉईडची गाठ मानेवर दिसत नसताना देखील विविध थायरॉईडचे आजार झालेले आहेत. त्यातील ब-याचशा थायरॉईडच्या आजारांचे दीर्घकाळापर्यंत निदान देखील होत नाही अशा सर्व महिला, पुरुष आणि बालकांनादेखील या संपूर्ण अभियानाचा फायदा होणार आहे. अनेकदा थायरॉईडच्या रोगांनी ग्रस्त महिला आणि पुरुषांना आळस, सुस्तपणा, शरीराव सूज येणे, भूक न लागतादेखील वजन वाढणे, आवाजात एकप्रकारचा जाडपणा अथवा घोगरेपणा येणे ही लक्षणे थायरॉईड ग्रंथींचे काम मंदावल्याचे दर्शवितात. अनेकदा अशा महिलांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते. नवजात बालकांमध्ये थायरॉईड ग्रंथींच्या स्त्रावाअभावी मानसिक दुर्बल्य येऊन अशी बालके लहान खुरी व मंदबुध्दी होऊ शकतात.थायरॉईड ग्रंथींच्या अतिस्त्रावामुळे अतिजास्त रोडपणा, छाती धडधड करणे व क्वचितप्रसंगी डोळे बाहेर येणे अथवा अंधत्वदेखील येऊ शकते.

मिशन थायरॉईड या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी 12 वाजता औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड ओ.पी.डी. चालविली जाणार असून त्यामध्ये Physician, Surgeon, Endocrinologist, Pathologist, Sonologist व Biochemist अशा विविध तज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व ब-याच दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे विविध परिणाम जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉईडचे विविध कॅन्सर यांसंबधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

थायरॉईडच्या विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनी दर गुरुवारी दुपारी 12 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत थायरॉईड क्लिनिकच्या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर, सह संचालक डॉ.अजय चंदनवाले आणि डॉ. पाखमोडे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here