Nandurbar News – नंदुरबार जिल्ह्यातील अनधिकृत चर्च बांधकामे आणि आदिवासींच्या धर्मांतराच्या वाढत्या प्रकरणांवर आज विधानसभेच्या अधिवेशनात जोरदार चर्चा झाली. धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा गंभीर प्रश्न सभागृहात उपस्थित केला.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अग्रवाल यांनी विधानसभेत सांगितले की, “नंदुरबार जिल्ह्यात १५० पेक्षा अधिक चर्च बेकायदेशीररीत्या उभारण्यात आले आहेत. ही बांधकामे कोणत्याही परवानगीशिवाय सुरू असून, यामागे आदिवासी समाजाचे बेकायदेशीर धर्मांतर करण्याचे षडयंत्र आहे.” आदिवासींना आर्थिक आणि सामाजिक आमिष दाखवून त्यांच्या श्रद्धेशी खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
यावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले, “या सर्व अनधिकृत चर्च बांधकामांची विभागीय आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवालाच्या आधारावर पुढील सहा महिन्यांत संबंधित अनधिकृत चर्च पाडण्यात येतील.” कोणत्याही धर्माचा अपमान न करता, कायद्याच्या चौकटीत कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आदिवासींच्या श्रद्धेचा आदर राखत, त्यांच्यावरील बेकायदेशीर दबाव किंवा आमिषांना आळा घालणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.
नंदुरबारमध्ये अनधिकृत चर्चचा मुद्दा आता राजकीय वळण घेणार हे निश्चित आहे. धर्मांतराचा गंभीर मुद्दा लक्षवेधी ठरल्याने आणि मंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्याने यावर पुढील काळातही चर्चा होण्याची शक्यता आहे.