नंदुरबार पोलीसांनी दोनच दिवसात रोखला सलग दुसरा बालविवाह..!!

0
738

नंदुरबार -३१/३/२३

बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” हा महत्वाकांक्षी उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आला आहे.

बालविवाह रोखणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी असून आपल्या परिसरात होवू घातलेल्या प्रत्येक बाल विवाहाबाबत नजिकच्या अक्षता समिती, बीट अंमलदार तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचीत करावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी ऑपरेशन अक्षताच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले होते.

दिनांक 31 मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील संवाद हॉल येथे जिल्हा पोलीस दलाची मासिक गुन्हे बैठकीत दिनांक 30 मार्च रोजी मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील वालंबा काठी येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबवून त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पथकाचा नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे हस्ते सत्कार करण्याचा छोटेखानी कार्यक्रम सुरु असतांनाच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना चाईल्ड लाईन,

नंदुरबर या संस्थेमार्फत माहिती मिळाली की, नंदुरबार तालुक्यातील बाल आमराई येथील एका अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील एका मुलासोबत आज दिनांक 31 मार्च 2023 रोजी बालविवाह होणार आहे.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यरत अक्षता सेलला नंदुरबार तालुक्यातील बाल आमराई येथे जावून सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करणेबाबत आदेशीत केले.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील अक्षता सेलच्या प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे, यांचे पथक, बाल संरक्षण अधिकारी व चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी तात्काळ नंदुरबार तालुक्यातील बाल आमराई येथे जावून तेथे पोलीस ठाणे स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अक्षता समितीचे सदस्यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली असता एका ठिकाणी साखारपुडा कार्यक्रम असल्याचे दिसून आले.

म्हणून अक्षता सेल व समितीच्या सदस्यांनी तेथे हजर असलेल्या मुलाच्या व मुलीच्या नातेवाईकांना त्यांच्या जन्म तारखे बाबत विचारपूस करुन आधार कार्डची मागणी केली.

आधार कार्डची पाहणी केल्यानंतर सदरची अल्पवयीन मुलगी 17 वर्षे व मुलाचे वय 19 वर्षे 10 महिने वयाचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अक्षता सेल व पोलीस ठाणे स्तरावर सुरु करण्यात आलेल्या अक्षता समितीने अल्पवयीन मुलाचे व मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाईकांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलगा व मुलगी यांना होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलाच्या व मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. नंदुरबार पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत अक्षता समिती व अक्षता सेलच्या माध्यमातून सलग दुसरा बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. ऑपरेशन अक्षता या उपक्रमास जनजागृतीच्या माध्यमातून यश येण्यास सुरुवात झाली आहे.

तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल.

त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समुळ उच्चाटन करण्यात यश येईल असे, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, अक्षता सेलचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुरेश सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक विनायक सोनवणे, पोलीस शिपाई विजय ढिवरे, अभय राजपुत, अरुणा मावची, बाल संरक्षण अधिकारी. गौतम वाघ, चाईल्ड लाईनच्या मेघा पाटील यांनी संयुक्तीकपणे केली आहे.

     पालकांनी अल्पवयीन मुलगी किंवा मुलगा यांचा बालविवाह न करता त्यांना उच्चतम शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करावे. तसेच मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा विवाह करावा. बालविवाहामुळे अनेक दुष्परिणाम होतात. बालविवाह करणाऱ्या पालकांना तसेच विवाहात हजर असलेल्या नातेवाईकांना दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात. तसेच आपल्या परिसरात होणाऱ्या बालविवाहाबाबत अक्षता समितीचे सदस्य पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंणवाडी सेविका किंवा बीट अंमलदार यांना सूचीत करावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.
spndb

श्री.पी.आर.पाटील, पोलीस अधीक्षक, नंदुरबार.

प्रविण चव्हाण ,एम. डी. टी.व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here