शहरातील सर्वच चौफुली सर्कलवरील अतिक्रमण काढले ; रस्त्यांचे रुंदीकरण
नंदुरबार : शहरातील विविध चौफुलींवरील रस्त्याची वर्दळ वाढल्याने वाहतूकीची कोंडी होत असल्याने रस्ता व्यापणारे बांधकाम जेसीबीने तोडून सुशोभिकरण तसेच ठेवण्यात आले आहे. यामुळे वाहतूक समस्या ठरणाऱ्या चौफुली रस्त्यांचे रुंदीकरण होत असून यामुळे हे रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. दरम्यान, नवापूर, धुळे चौफुलीसह करण चौफुली येथील रस्ता व्यापणारे बांधकाम पालिकेने हटविले आहे.
नंदुरबार नगर परिषद हद्दीतील नवापूर चौफुली, धुळे चौफुली, करण चौफुली येथे सर्कलचे बांधकाम करुन सुशोभिकरण पालिकेतर्फे करण्यात आले होते. सदर रस्त्यावरील वाहतूकीची वर्दळ वाढल्याने तिन्ही ठिकाणी वाहतूकीची कोंडी होऊ लागली होती. राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खा.डॉ.हीना गावित यांनी नंदुरबार नगर परिषदेत घेतलेल्या ४ मे रोजीच्या आढावा बैठकीत चौफुलींवर बांधकामाबाबत देखील चर्चा झाली. शहरातील वाहतूकीस अडचण होणाऱ्या ठिकाणचे बांधकाम हटविण्याबाबत चर्चा होवून बांधकामे हटविण्याचे निर्देश देण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यानुसार दि.५ मे रोजी नंदुरबार नगर परिषदेतर्फे नवापूर चौफुली व धुळे चौफुलीवरील सर्कलचे बांधकाम तोडण्यात आले. धुळे रोडवरील सर्कलमधील गजलक्ष्मी मुर्ती व नवापूर चौफुली सर्कलमधील स्व.इंदिरा गांधी व स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमा तशाच ठेवण्यात आल्या. दोन्ही सर्कल आकाराने लहान झाल्याने धुळे चौफुलीवरील सर्कलचा व्यास सहा मीटरचा तर नवापूर चौफुली सर्कलचा व्यास ६.५० मीटरने कमी करण्यात आला. सदर चौफुलींवरील रस्त्यांची रुंदी वाढल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होत आहे.
दरम्यान, दि.५ मे रोजीच करण चौफुली येथील सर्कलच्या बाह्य भागाचे बांधकाम हटविण्यासाठी पथक गेले असता किरकोळ वाद झाल्याने या चौफुलीवरील बांधकामाचे निष्कासन स्थगीत करण्यात आले होते. मात्र सोमवारी करण चौफुलीवरील सर्कलच्या बाह्य भागाचे बांधकाम हटविण्यात आले. सर्कलमधील अशोक चक्राची प्रतिकृती तशीच ठेवण्यात आली आहे. बाह्य भागाचे बांधकाम तोडण्यात आल्याने सर्कलचा व्यास ८ मीटरने कमी झाल्याचे चौफुलीचे रस्ते रुंद होणार असून यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार असल्याचे मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांनी सांगितले.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.