कोळदेकरांचा रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद
नंदुरबार- मागील तीन वर्षाच्या कोरोना काळापासून रक्ताची गरज भासत आहे. नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेलचे प्रमाण अधिक असल्याने अनेक गरोदर महिलांना प्रसूतीवेळी रक्ताची गरज भासत असते.रक्तदानाची गरज ओळखून व रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे मानून कोळदेकरांनी रक्तदान करीत एक आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले.
नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथील ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी धुळे येथील श्री नवजीवन रक्तदान केंद्राचे संचालक सुनील चौधरी , कोळदेच्या सरपंच मोनीबाई वळवी, उपसरपंच आनंद गावित, चेअरमन वि.वि.सोसायटी कोळदे श्री सुदामभाई चौधरी उपस्थित होते.
यावेळी जि.प. अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित म्हणाल्या की, कोरोना सारख्या महामारी काळापासून रक्ताची खरी गरज भासू लागली आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी रक्ताची आवश्यकता भासत असते. प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे असून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदाना संदर्भात अनेकांमध्ये गैरसमज असून त्या गैरसमजुतीचे निरसन करून प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढे येणे काळाची गरज आहे. नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल आजारावर उपचारासह गरोदर महिलांना प्रसूती वेळी रक्ताची खरी गरज भासत असते. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून कोळदे ग्रामस्थांनी शिबिर आयोजित करून राबविलेल्या रक्तदानाचा उपक्रम खरोखरच आदर्शदायी व कौतुकास्पद असल्याचे डॉ.सुप्रिया गावित यांनी सांगितले.
रक्त संकलनासाठी श्री नवजीवन रक्तदान केंद्राच्या सदस्यांनी सहकार्य केले.
रवींद्र राजपूत एम.डी.टी.व्ही. न्युज… कोळदा