नंदुरबार पोलिसांची कामगिरी : जनसामान्यातून होतेय कौतुक
नंदूरबार : – नंदुरबार पोलिसांनी ‘ ऑपरेशन अक्षदा’ अंतर्गत नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे दोन व अक्कलकुवा तालुक्यात एक असा तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले आहेत.याप्रकरणी अल्पवयीन मुलींच्या पालकांचे समुपदेशन करून पोलीस प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, विसरवाडी व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना स्थानिक नागरिकांकडून दि. ४ मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विसरवाडी गावात दोन व अक्कलकुवा तालुक्यातील बेटी गावातील एका अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे त्यांचे कुटुंबिय नियोजन करीत असल्याची माहिती मिळाली होती. सदर घटनेची माहिती विसरवाडी व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना कळविल्याने त्यांनी सदरचे बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलींच्या पालकांचे समुपदेशन करण्याबाबत आदेशीत केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यानुसार विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांनी तात्काळ माहिती काढली. विसरवाडी गावातील एका अल्पवयीन मुलींचा विवाह साक्री व एका अल्पवयीन मुलीचा विवाह नंदुरबार येथील तरुणांसोबत निश्चित करण्यात आला होता, परंतु विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तेथे दोन्ही अल्पवयीन मुलींच्या घरी जावून अल्पवयीन मुलींच्या कुटुंबीयांचे व त्यांच्या समाजाचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. दोन्ही अल्पवयीन मुलीच्या पालकांना विसरवाडी पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.
तसेच अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील बेटी या गावात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावीत यांनी जावून माहिती घेतली असता गावातील अल्पवयीन मुलीचा होराफळी गावातील तरुणासोबत विवाह निश्चित करण्यात आला होता. राजेश गावीत यांनी अल्पवयीन मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाईकांना तसेच हजर असलेले गावकरी यांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या “ऑपरेशन अक्षता” अंतर्गत नंदुरबार पोलीसांनी तीन दिवसात पाचवा बालविवाह रोखल्याने नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. आज पावेतो नंदुरबार जिल्ह्यातील ६३४ ग्रामपंचायतींपैकी ६१५ ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. उर्वरीत ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील, बेटी गावाचे पोलीस पाटील सुरेश वसावे, होराफळीचे पोलीस पाटील दारासिंग वळवी यांनी केली आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.