साक्री -२१/२/२३
राज्याच्या मानव विकास मिशनच्या योजनेअंतर्गत विविध सहयोजना राबवल्या जातात..
त्या अंतर्गत मोफत सायकल वाटप विद्यार्थिनींना केलं जातं.
शिक्षण आरोग्य आणि उपजीविकेचे साधन या जीवनाच्या तीन महत्त्वाच्या पैलूंसाठी दिलेला लढा आणि त्यांची प्रत्यक्षात झालेली पूर्तता यांचा मिलाफ म्हणजे मानव विकास होय..
एका बाजूला भरभराट आणि दुसऱ्या बाजूला जीवन जगण्यासाठीचा संघर्ष उत्पन्न आणि रोजगाराच्या बाबतीत असलेली अस्थिरता अशा विरोधाभास असलेल्या समाजामध्ये सर्वसामान्य माणसाचे जीवन सुरक्षित करून त्यांचा विकास साधणे ही आव्हानात्मक बाब असली तरी शासन ते आव्हान स्वीकारताना दिसतंय.
काय आहे ही सायकल वाटप योजना :
राज्यातील 125 अति मागास तालुक्यांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशन अंतर्गत राबवली जाते.
मानव विकास मिशन स्वतः सायकल खरेदी न करता त्याची रक्कम लाभार्थी मुलींच्या खात्यात थेट जमा करते.
त्यासाठी सायकल खरेदी पूर्वी दोन हजार रुपयांची रक्कम मुलींच्या बँक खात्यात टाकली जाते. सायकल खरेदी केल्यानंतर टॅक्स प्लेयर आयडेंटिफिकेशन नंबर असलेली पावती संबंधित शालेय व्यवस्थापन व विकास समितीकडे सादर केल्यानंतर उर्वरित एक हजार रुपयांचा निधी पुन्हा संबंधित मुलीच्या खात्यात जमा होतो.
या योजनेतून सायकल खरेदीसाठी प्रत्येक मुलीला कमाल 3000 रुपये पर्यंतचा निधी मिळतो. सदर योजनेची अंमलबजावणी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत केली जाते.
सन 2013-14 पासून आज पर्यंत एक लाख दहा हजार 143 मुलींनी या योजनेचा लाभ घेतलाय. गाव ते शाळा वाहतुकीची सुविधा मुलींना व्हावी या दृष्टीने ही योजना मुलींसाठी लाभदायक ठरते.. त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील विद्या विकास मंडळाचे आदर्श विद्यालय आणि जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींना संस्थेची सचिव आबासाहेब सुरेश पाटील आणि जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती मंगलाताई पाटील यांच्या हस्ते सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
सुरेश पाटील यांनी सर्व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच अभिनंदन केलं.
यावेळी त्यांच्या समवेत सि.गो पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर ए बी पाटील, मुख्याध्यापक डी एन पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
जितेंद्र जगदाळे साक्री तालुका प्रतिनिधी एम.डी. टी.व्ही न्यूज