नंदुरबार -२७/४/२३
जिल्हा पोलीस गुन्हे बैठकीत जिल्ह्यातील मालमत्तेविरुध्द्चे घरफोडी, चोरी इत्यादी गुन्ह्यांचा गुन्हे आढावा दरमहा घेण्यात येत असतो.
नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणून मुद्देमाल हस्तगत करणे हे मोठे आव्हान होते. त्याअनुषंगाने घरफोडीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
दिनांक 25 एप्रिल रोजी रात्री 03.45 वा. सुमारास गीता सचानंद गंगवाणी (40) रा. जुनी सिंधी कॉलनी, प्लॉट नंबर- ई-4 यांचे राहते घराचे स्वयंपाक खोलीच्या बंद दरवाजा अज्ञात आरोपीताने उघडून घरातील कपाटामधून 2 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व एक मोबाईल चोरुन नेला
म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे दिनांक 25 एप्रिल रोजी 13.13 वा. अज्ञात आरोपीताविरुध्द् गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.
दिनांक 25 एप्रिल रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जुनी सिंधी कॉलनी येथे सकाळी झालेली घरफोडी नंदुरबार शहरातील सराईत आरोपी नामे बुट्टा याने केलेली असून तो गिरीविहार गेट परिसरात फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांना सांगितली.
उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमीमधील संशयीतास ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयीत आरोपी बुट्टा याचा गिरीविहार गेट परिसरात जावून शोध घेतला असता काका का ढाबा येथे तो दिसला. उपनगर पोलीस ठाण्याचे पथक त्याच्या दिशने येत असल्याचे लक्षात येताच त्याने तेथून पळ काढला, परंतु पथकाने त्यास पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता विशाल ऊर्फ बुट्टा विजयकुमार तलरेजा (19) व रा. बाबा गरीबदास मंदिराच्या मागे, सिंधी कॉलनी, नंदुरबार असे सांगितले. त्याची कायदेशीर प्रक्रिया करुन झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 60 हजार 800 रुपये रोख, 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 7000/- रुपये किमतीचा मोबाईल असा एकुण 2 लाख 18 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतास वरनमुद सोन्याचे दागिने, रोख रुपये व मोबाईल बाबत विचारपूस केली असता त्याने जुनि सिंधी कॉलनी येथे एका घराचा स्वयंपाक खोलीच्या बंद दरवाजा उघडून घरातील कपाटातून चोरी केले बाबत सविस्तर माहिती दिली.
त्याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतावर यापूर्वी देखील नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविरुध्द्चे 05 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजून आल्याने त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी यावेळी सांगितले.
घरफोडी सारखा मालमत्तेविरुध्द्चा गंभीर गुन्हा अवघ्या 08 तासार उघड करुन मुद्देमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकास नंदुरबार जिल्ह्याचे पेालीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उप निरीक्षक प्रविण कोळी, सहा. पोलीस उप निरीक्षक पानाजी वसावे, पोलीस अंमलदार विलास वसावे, विपुल पाटील, बाबुराव बागुल यांच्या पथकाने केली आहे.
प्रविण चव्हाण एम. डी. टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार.