नंदूरबार : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ( NDMA), नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA), मंत्रालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA), नंदुरबार यांच्या समन्वयातुन जिल्ह्यात आपत्ती पूर्व तयारी, क्षमतावर्धन व प्रशिक्षण, DRR अंतर्गत जिल्ह्यामध्ये आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून सदर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ३०० आपदा मित्र स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारचे विषय विशेषज्ञ कृषि हवामान सचिन फड यांनी आपदा मित्र स्वयंसेवकांना जिल्ह्यातील हवामानाचा आढावा, हवामान बदल, हवामान बदलामुळे येणाऱ्या आपत्ती, त्याचे परीणाम व आपत्तींचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील सरासरी हवामानात बदल होत असून त्याचा परिणाम म्हणून उष्णतेची लाट, थंडीची लाट, गारपीट तसेच अवेळी पाऊस, कमी दिवसात जास्त पाऊस, चक्रीवादळ, विज पडण्याच्या घटना अनुभवयास येत आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान, जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. लोकांनी तसेच आपदा मित्रांनी हवामानाचा अंदाज घेऊन तसेच विज पडण्याची पूर्वसूचना प्राप्त करण्यासाठी दामिनी आणि हवामान अंदाज व कृषि सल्ला मिळवण्यासाठी मेघदूत ॲप वापरावे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस निरीक्षक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) धुळे, शमोहन परीहार, पोलीस उपनिरीक्षक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) धुळे, श्री विजय गावंडे, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, NDMA प्रकल्प, सुनिल गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हा नंदुरबार वसंत बोरसे व SDRF धुळे यांचे जवान, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नंदुरबारचे प्राध्यापक उपस्थित होते.