नंदुरबार (प्रतिनिधी) विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि विद्यार्थी विकास विभाग, नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय नंदुरबार, यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनांक २५ मार्च २०२३ रोजी “स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेने दिलेला सामाजिक न्याय” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून मा.प्रा.ए. एस. गेडाम (कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर) उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात सामाजिक न्यायाची सुरुवात राजश्री शाहू महाराज यांच्या काळापासून कशी झाली व सामाजिक आरक्षण हे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी कसे महत्वपूर्ण आहे हे स्पष्ट केले. सामाजिक न्यायाद्वारे अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधान मध्ये नमूद केलेल्या तरतुदींचा आढावा त्यांनी मांडला. विद्यार्थ्यांनी सामाजिक न्यायासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान त्यांनी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले.
सामाजिक न्यायासंबंधी प्रस्तावना करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.डी. चौधरी यांनी सामाजिक न्याय हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे असे स्पष्ट केले. नंदुरबार तालुका विधायक समितीचे वरिष्ठ महाविद्यालय समन्वयक डॉ.एम. एस. रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभाग सहाय्यक समन्वयक प्रा. आर.एन.नगराळे यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास समन्वयक प्रा. डॉ. आशा तिवारी यांनी केले. त्यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे अर्थसहाय्य केल्याबद्दल विशेष आभार मानले.